इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोलकात्ताः लोकसभेच्या निवणूका जशा जशा जवळ येऊ लागल्या आहे. राजकीय पक्ष उमेदवारांची यादी घोषित करत आहे. पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसने लोकसभेच्या ४२ जागांसाठी उमेदवार जाहीर करून पुन्हा इंडिया आघाडीला धक्का दिला. या ठिकाणी आघाडीची समेट होईल असे बोलले जात होते. पण, ही शक्यता आता जवळपास मावळली आहे.
कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची रॅली घेतली. तिला जन गर्जन सभा असे नाव देण्यात आले. या रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, की आज मी बंगालच्या ४२ लोकसभा जागांसाठी तृणमूलचे ४२ उमेदवार जाहीर केले आहेत. ‘इंडिया’ आघाडीच्या भाग असलेल्या ममता यांनी काँग्रेससाठी एकही जागा सोडली नाही. सहा जागांवर वाटाघाटी सुरू होत्या; परंतु आता राज्यातील सर्व जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
अधीर रंजन चौधरी विरोधात युसूफ पठाण
या ४२ जागा जाहीर करतांना तृणमूलने बहारमपूर मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात क्रिकेटर युसूफ पठाण यांना उमेदवारी दिली आहे. तर बशीरहाटमधून अभिनेत्री नुसरत जहाँ हिचे तिकीट कापले आहे. कृष्णानगरचे महुआ मोईत्रा, राणाघाटचे मुकुटमणी अधिकारी, दमदममधून सौगता राय, बीरभूममधून शताब्दी राय, हुगळीतून रचना बॅनर्जी, आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा, दुर्गापूरचे कीर्ती आझाद आणि डायमंड हार्बरमधून अभिषेक बॅनर्जी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.