इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चंदीगडः पश्चिम बंगालमधील भाजपच्या खासदाराने पक्षाचा राजीनामा देऊन २४ तास होत नाही, तोच हरियाणाच्या हिसार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ब्रिजेंद्र चौधरी यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी ट्विट करून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.
माजी केंद्रीय मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह यांचा मुलगा ब्रिजेंद्र चौधरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. यामुळे ते पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, चौधरी बिरेंद्र सिंह भाजप सोडणार असल्याची चर्चा नाही. खासदार ब्रिजेंद्र चौधरी यांनी ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, की राजकीय कारणांमुळे मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो.
चौधरी यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असताना आज त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. खासदार सिंह यांना भाजपमध्ये भविष्य दिसत नव्हते. त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणे अवघड झाले होते. २०१९ मध्ये त्यांनी जेजेपीच्या दुष्यंत चौटाला यांचा पराभव केला. बिश्नोई आता भाजपमध्ये सामील झाले आहेत. हरियाणात लोकसभेच्या दहा जागा असून सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या. हिस्सार मतदारसंघातील उमेदवाराचे नाव अद्याप भाजपने जाहीर केले नाही.