इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव तालुक्यातील खेरी गावातील जळगाव जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसमवेत “गणितासाठी १० दिवस” या उपक्रमांतर्गत गणिताच्या वर्गात शिक्षण घेतले. त्यांनी विद्यार्थ्यांना गणित आणि भाषेतील कौशल्ये शिकण्यावर भर देण्याचा सल्ला दिला. गणिताची भीती बाळगू नका, तर त्याला खेळाप्रमाणे वागवा, असे त्यांनी सांगितले. ज्यांना योग्य उत्तर माहित नाही त्यांना फटकारण्याऐवजी सहकारी शिक्षण वातावरण वाढवले पाहिजे, कारण आपण सर्वजण आपल्याला जे माहित नाही ते शिकण्यासाठी शाळेत जातो. त्यांनी चुका केल्या तर घाबरू नका असे निर्देश दिले.
निपूण भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात उद्यापासून १० ऑक्टोंबर ते २० ऑक्टोंबर पर्यंत इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वीच्या मुलांसाठी ‘दहा दिवस गणितासाठी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचे अंकगणित कौशल्य वृध्दींगत व्हावे, यासाठी कालबध्द कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, डायट प्राचार्य, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी काम करत आहेत.
दहा दिवस गणितासाठी या उपक्रमात गणनपूर्व तयारी, संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया, सराव तसेच कृती या पध्दतीचा वापर करत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शैक्षणिक साहित्याचा वापर करून गणित रंजक पद्धतीने शिकविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षकांना त्यांच्या स्तरावर विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन पूरक अधिकच्या कृतींचे आयोजन करता येण्याची मुभा आहे.
या उपक्रमात आनंददायी कृतींचा, गणितीय खेळांचा, परिसरात व शाळेत उपलब्ध साहित्याचा यथायोग्य वापर करून गणितीय संकल्पनांचे विद्यार्थ्यांना आकलन होईल. अशा कृती कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण होईल. पायाभूत क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यकतेनुसार उच्चस्तर अध्ययन कृती घेण्याच्यासूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व डायट मधील सर्व अधिकाऱ्यांनी दैनंदिन किमान २ शाळांना भेटी कराव्यात व सदर उपक्रम सुरू असल्याची खात्री करावी. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.