इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आली असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जळगावच्या कार्यकर्त्यांशी ठाकरे मातोश्रीवर चर्चा करीत असताना भाजपच्या नेत्या ललिता पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबई येथील मातोश्री दरबारात उद्धव ठाकरे यांच्या सोबत जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या जळगाव लोकसभा समन्वयक अॅड. ललिता पाटील यांच्या उपस्थितीने आश्चर्य व्यक्त होत आहे. २००९ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अॅड. पाटील यांच्या म्हणण्यानुसार भाजपमध्ये गेल्या पाच वर्षात प्रामाणिकपणाने काम करूनही कोणतेही पद देण्यात आले नाही. भाजपच्या बैठकांना ही बोलविले जात नव्हते.
आपल्याला लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे; मात्र भाजपकडून उमेदवारी मिळण्याची आशा संपुष्टात आल्याने त्यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अॅड. ललिता पाटील या जळगाव लोकसभेसाठी ठाकरे गटात सहभागी होऊन उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत. या अगोदर डॉ. हर्षल माने, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची नावे जळगाव लोकसभेसाठी चर्चेत होती.