इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. त्यांचा कार्यकाळ हा २०२७ पर्यंत असतांना त्यांनी राजीनामा दिला. विशेष म्हणजे निवडणूकीला अवघे काही दिवस बाकी असतांना त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे चर्चेलाही उधान आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगात आधीच निवडणूक आयुक्ताचे एक पद खाली आहे. त्यानंतर आता अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याने आता दोन पदे खाली झाली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगात महत्त्वाच्या पदावर केवळ मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे असणार आहेत.
अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने आपल्या एका अधिसूचनेत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. हा राजीनामा ९ मार्चपासून म्हणजे आजपासून लागू होणार आहे, असं अधिसूचनेत म्हटले आहे.
अरुण गोयल हे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी १८ नोव्हेंबर २०२२ ला स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर लगेच निवडणूक आयोगाने त्यांना निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी सोपवली. अरुण गोयल यांनी १५ महिने निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर हा राजीनामा दिला.