नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील सर्वात सुंदर आणि उच्च दर्जाच्या सुविधांनी युक्त असा दिव्यांग पार्क नागपूर शहरात होत असून याचा फायदा नागपुरातील दिव्यांगाना होणार असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्व नागपुरातील सुर्य नगर येथे दिव्यांगांसाठी अनुभुती इन्क्लुझिव्ह पार्कच्या लोकार्पण समारंभाप्रसंगी व्यक्त केला.
पूर्व नागपूरच्या सूर्य नगर, लता मंगेशकर गार्डन,पारडी येथे दिव्यांगाकरिता अनुभुती इन्क्लुझिव्ह पार्कचा लोकार्पण सोहळा आज गडकरींच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी आणि पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे प्रामुख्याने उपस्थित होते .
यावेळी देशातील या पहिल्या दिव्यांगा पार्क बद्दल बोलताना गडकरी यांनी सांगितले की ,मध्य प्रदेशातील उज्जैन येथे तत्कालीन जिल्हाधिकारी संकेत भोंडवे यांच्या निरीक्षणाखाली दिव्यांग पार्क उभारल्या गेला. याच पार्कच्या धर्तीवर असाच एक पार्क नागपुरात व्हावा अशी आमची इच्छा होती.
नागपुरातील या दिव्यांग पार्क साठी संकेत भोंडवे यांचे सहकार्य लाभले असून या पार्कच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, डॉ.पंकज मारू,रितेश यादव आणि संजय कुलकर्णी यांचे यात विशेष योगदान लाभलेले आहेत.
सर्वांना लक्षात राहील असा पार्क नागपूर इथे उभारला गेला असून या पार्कमध्ये गुणवत्तेचे काम व्हावे अशी अपेक्षा आहे.
दिव्यांगाच्या अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्कमध्ये फिजिओथेरपी इमारत,हायड्रोथेरपी रूम,क्लासरूम, वॉटर इक्विटी झोन, किचन कॅन्टीन, दृष्टीहीन लोकांसाठी स्पर्शिकामार्ग, श्रवणदोष असलेल्यांसाठी सांकेतिक भाषा निर्देशक आणि ब्रेल लिपी मधील नामांकन व चिन्ह यांचा समावेश आहे.
तसेच नक्षत्रवाटिका, झायलोफोन आणि पक्षांच्या आवाजातील संगीत थेरपी,ब्रेल बुद्धिबळ, दिव्यांगांसाठी रबर फ्लोरिंग वर खेळांची उपकरणे आणि ओपन जिम अशा विविध सुविधा असल्याचे गडकरींनी सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून जिल्हा विकास नियोजन समिती मधून आर्थिक तरतूद करून दिव्यांगाना या पार्क पर्यंत येण्या जाण्याची सोय व्हावी म्हणून इलेक्ट्रिक बस देण्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे.
दिव्यांगांसाठी उभारलेला अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्क देशातला आदर्श असा एक पार्क असून या पार्कचे नियोजन आणि व्यवस्थापन विशेष टीम स्थापन करून येथील सुविधेची परिणामकारक अंमलबजावणी होईल यासाठी प्रयत्न करावे असेही गडकरींनी सांगितले. भविष्यात या दिव्यांगाच्या पार्क साठी अनेक नवनवीन आधुनिक उपकरणे पुरवण्यावर आपला भर राहणार असल्याचे गडकरी यांनी नमुद केले.
दिव्यांगासाठी उभारलेले अनुभुती इन्क्लुझिव्ह पार्क हे दिव्यांगाच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम करेल तसेच दिव्यांगासाठी नागपुरात सर्वात मोठे स्पोर्ट्स स्टेडियम उभारले जाणार असल्याचे गडकरींनी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांना मुख्य धारेत आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या आहेत.केंद्र सरकार आणि राज्य सरकार दिव्यांगासाठी विविध आधुनिक उपकरणे आणि आरोग्य सेवा पूरवीत आहे. राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये दिव्यांगासाठी आरक्षणाची सुद्धा तरतूद केलेली आहे.
लहान मुलांतील कर्णबधिरता आटोक्यात आणण्यासाठी कॉक्लिअर इम्प्लांटची सुविधा नागपुरात उपलब्ध झालेली आहे. अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्क येथे दिव्यांगांसाठी विविध थेरपी आणि प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक उपलब्ध आहेत. दिव्यांगांसाठी तयार झालेले अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्क हे नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीतून आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या प्रयत्नातून साकार झालेले आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी विद्यार्थी , परिसरातील नागरिक ,स्थानिक लोकप्रतिनिधी , नागपूर सुधार प्रन्यासचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.