नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्टेशनवाडी भागात चेष्टामस्करीतील धक्काबुक्कीत गुप्तांगाला मार लागल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लवनीत किरणकुमार भगवाने (१५ जुनी स्टेशनवाडी,देवळाली कॅम्प) असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत सुनिल झिनवाल (१९ रा.सदर) या युवकाने फिर्याद दिली आहे. लवनीत भगवाने हा बालक गुरूवारी (दि.७) रात्री आपल्या मित्रांसमवेत घर परिसरातील फिल्टेशन प्लॉट जवळ नेहमी प्रमाणे खेळत असतांना ही घटना घडली. मित्रांमधील चष्टामस्करीत सुमित नावाच्या मित्राशी त्याची धक्काबुक्की झाली.
या घटनेत मित्राने लवनीतच्या पोटात दोन बुक्के मारले. तसेच त्याला खाली पाडून त्याच्या गुप्त भागावर हाताचा कोपरा मारला. त्यात लवनीत बेशुद्ध झाला. त्याला मारणारा मित्र व अजून एक जणाने त्याला कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र काही वेळानंतर उपचारादरम्यान लवनीतचा मृत्यू झाला. याबाबत मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मित्रावर देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आहिरे करीत आहेत.