इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी आसाममधील युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. नागरिकांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट द्यावी आणि तिथल्या असामान्य नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घ्यावा असे आवाहन देखील पंतप्रधानांनी केले. यावेळी त्यांनी या ठिकाणाच्या संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये आघाडीवर असलेल्या वन दुर्गा या महिला वनरक्षकांच्या पथकासोबत संवाद साधला आणि या नैसर्गिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी त्यांची बांधिलकी आणि धैर्याची प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी यांनी लखीमाई, प्रद्युम्न आणि फूलमाई या हत्तींना ऊस भरवतानाची काही छायाचित्रे देखील सामाईक केली.
आपल्या या भेटीची माहिती एक्स या समाजमाध्यमावरून देताना पंतप्रधान म्हणालेः“आज सकाळी मी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये होतो. हिरव्यागार वनराईने वेढलेल्या युनेस्कोच्या या जागतिक वारसा स्थानाला एकशिंगी गेंड्यासह पशुपक्षी आणि वनस्पतींच्या विविधतेचे वरदान लाभले आहे.”
“आपली वने आणि वन्यजीवांचे अतिशय धाडसाने रक्षण करत असलेल्या नैसर्गिक संपदेच्या संवर्धनात आघाडीवर असलेल्या वन दुर्गा या महिला वन रक्षकांच्या पथकासोबत संवाद साधला. आपल्या नैसर्गिक वारशांचे रक्षण करण्याची त्यांची बांधिलकी आणि धैर्य खरोखरच प्रेरणादायी आहे. लखीमाई, प्रद्युम्न आणि फूलमाई यांना ऊस भरवत आहे. काझीरंगा गेंड्यांसाठी ओळखले जात असते तरी येथे इतर विविध प्रजातींसह हत्ती देखील मोठ्या प्रमाणात आहेत”