नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पिस्तूलचा धाक दाखवित एका परप्रांतीय व्यावसायीकाचे कारमधून अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत व्यावसायीकास मुळ गावी घेवून जात साडे बारा लाखाची खंडणी उकळण्यात आली असून, पैसे हाती पडताच व्यावसायीकास मध्यप्रदेशात सोडून भामट्यांनी पळ काढला आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपहरण,खंडणी व आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश कुमार गुप्ता (रा.शंभूराजे हाईटस,उपेंद्रनगर सिडको) या व्यावसायीकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मुळचे देवास (मध्यप्रदेश) येथील गुप्ता यांचा शहरात फॅब्रीकेशनचा व्यवसाय असून सोमवारी (दि.४) दुपारच्या सुमारास त्यांना अपहरण कर्त्यांनी खिडकीचे ग्रील बनवायचे असल्याचे सांगून त्यांचे अपहरण केले. सुयोजीत गार्डन भागातील आसाराम बापू ब्रिज भागात ते ऑर्डर घेण्यासाठी आले असता चार जणांच्या टोळक्याने त्यांना इर्टिंगा कारमध्ये बळजबरीने बसवून पळवून नेले होते. वाटेत पिस्तूलचा धाक दाखवत गुप्ता यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली. त्यामुळे गुप्ता यांना मध्यप्रदेशातील देवास येथे नेण्यात आले.
या ठिकाणी गुप्ता यांनी नातेवाईक व कुटूंबियाच्या माध्यमातून १२ लाख ३० हजाराची रक्कम अहरणकर्त्यांना जमवून दिली. पैसे हातात पडताच भामट्यांनी गुप्ता यांना देवास येथील बसस्थानक परिसरात सोडून देत पोबारा केला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.