इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सटाणा : बागलाण तालुक्यातील वाहनधारकांची मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड टोलनाक्यावर मोठी लूट सुरू असून मंगरुळ फाटा ते चांदवड या अवघ्या अडीच किलोमीटर अंतरासाठी पूर्ण टोल भरावा लागतो. हे अन्यायकारक असून प्रशासनाने या बाबीची गांभीर्याने दखल घेत ही लूट तातडीने थांबवावी आणि बागलाण तालुक्यातील वाहनधारकांना चांदवड टोलनाक्यावर नाममात्र दहा किंवा वीस रुपये टोल आकारून दिलासा द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशारा बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी दिला आहे.
यासंदर्भात माजी आमदार चव्हाण नॅशनल अॅथोरिटी ऑफ इंडिया (एनएचआय) चे प्रकल्प संचालक बी.एस.साळुंके यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदनही दिले. निवेदनात, बागलाण तालुक्यातील अनेक वाहन मालकांनी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड येथील टोलनाक्यावर होत असलेल्या अन्यायकारक टोल वसुलीबाबत कैफीयत मांडून निवेदन दिले आहे. तालुक्यातील अनेक वाहनधारकांना चांदवड-मनमाड-शिर्डी- नगर या रस्त्यावरून अनेकवेळा प्रवास करावा लागतो. यावेळी मंगरुळ फाटा ते चांदवड या अडीच किलोमीटर अंतरासाठी बागलाण तालुक्यातील वाहनधारकांना संपूर्ण टोल भरावा लागतो. हे अन्यायकारक आहे. याबाबत स्थानिक टोल चालकांशी वादविवाद होत असतात. त्यामुळे अनेकदा अप्रिय घटनांना वाहनधारक व टोल प्रशासनाला सामोरे जावे लागते.
वास्तविक बागलाण तालुक्यातील वाहनधारकांना अडीच किलोमीटरच्या अंतरासाठी संपूर्ण रस्त्याची टोल आकारणी करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये टोल प्रशासनाबाबत असंतोष निर्माण होत आहे. तालुक्याच्या नामपुर तसेच लखमापूर परिसरातील वाहनधारक उमराणेपासून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाचा वापर करतात. मात्र अवघ्या वीस किलोमीटर अंतरासाठी चांदवड टोलनाक्यावर बागलाण तालुक्यातील वाहनधारकांकडून एका बाजूने ३३० रुपये तर परतीच्या प्रवासासाठी ६६० रुपये वसूल केले जातात. त्याउलट मालेगाव तालुक्यातील वाहनधारकांना ५० ते १०० किलोमीटर महामार्गाचा वापर करूनही त्यांना लोकलमध्ये सुविधा देऊन नाममात्र टोल आकारला जातो. हा बागलाणवासीयांवर मोठा अन्याय आहे. पिंपळगाव टोल नाक्यावर एमएच ४१ या वाहनांना एका एका बाजूने ४० तर परतीसाठी २० रुपये टोल आकारला जातो. मग चांदवड टोल नाक्यावरच वेगळा नियम का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
बागलाण तालुक्यातील वाहनचालक मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मंगरुळ फाटा ते चांदवड व तेथून पुढे मनमाड-शिर्डी-नगरला जाण्यासाठी अवघ्या अडीच किलोमीटर रस्त्याचा वापर करीत असल्याने तालुक्यातील वाहनधारकांना चांदवड येथील टोलनाक्यावर नाममात्र दहा किंवा वीस रुपये टोल आकारला जावा अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशाराही माजी आमदार चव्हाण यांनी निवेदनात दिला आहे.