नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बनावट कागदपत्राच्या आधारे मृतव्यक्तीच्या नावे जनरल मुख्त्यारपत्र तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृताच्या भावजयीने दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात ७३ वर्षीय वृध्देसह एका विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गजराबाई भिमराव गांगुर्डे (७३ रा.दसक,जेलरोड) व विलास विठ्ठल लोखंडे (४८ रा.लोखंडे मळा,जुना सायखेडारोड) असे मृत व्यक्तीचे मुख्त्यारपत्र बनविणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत रत्नाबाई उर्फ रत्नमाला भगवान उर्फ भगवंता गागुर्डे (रा.गंगापूर गोवर्धन ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.
रत्नाबाई गांगुर्डे यांनी फिर्यादीत आपल्या दिराचा मृत्यू झालेला असतांना संशयितांनी ३१ मे २०१६ रोजी जमिनीचे परस्पर बनावट कागदपत्रांच्या आधारे संमतीपत्र तसेच जनरल मुख्त्यारपत्र दुय्यम निबंधक कार्यालय नाशिकरोड येथे नोंदणी केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.