इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः नवी मुंबईत ‘एआय’चा वापर करून वडिलांकडून एक लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक झालेली व्यक्ती ही सायन येथील एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. कॉलेजमध्ये असताना त्यांना एका आंतरराष्ट्रीय नंबरवरुन व्हॉट्सअॅप कॉल आला. समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने आपण ‘सीबीआय’मधून बोलत असल्याचे सांगत ही फसवणूक केली.
व्हॉट्सअॅप कॉलमधून सांगण्यात आले की, नवी मुंबईच्या ‘सीवूड’मध्ये घडलेल्या प्रकरणी तुमच्या मुलाला बलात्काराच्या गुन्हात पकडले असून त्याच्यावरील अटकेची कारवाई टाळण्यासाठी एक लाख रुपयांची द्या. त्यानंतर कॅाल करणा-याने या प्राध्यापकाला कोणतीही हालचाल करू न देता तात्काळ निर्णय घेण्यास भाग पाडले. खात्री पटावी म्हणून आरोपीने प्राध्यापकांचे मुलासोबतही बोलणे करून दिले. मुलाचे बोलणे ऐकून घाबरलेल्या वडिलांनी आरोपीच्या सांगण्यावरून विविध खात्यांमध्ये तब्बल एक लाख रुपये जमा केले.
त्यानंतर या प्राध्यापकाने पुन्हा मुलाला फोन लावला असता तो घरीच असल्याचे कळले. त्यानंतर वडिलांनी मुलाला हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर ही फसवणूक असल्याचे समोर आले. त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. संबधित मुलाचा आवाज वडिलांना ऐकवण्यासाठी अगोदर बाप लेकाचे फोनवरील बोलणे रेकॉर्ड करण्यात आले होते का, असे आवाज रेकॉर्ड करण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर केला गेला का, याचा आता शोध घेतला जात आहे. एआय’चा वापर करून मुलाचा आवाज मॅच करुन ही फसवणूक या भामट्याने केल्याचे उघड झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला….