इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः महिला दिनानिमित्त घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रुपयाची घोषणा झाल्यानंतर महिला आनंदात असतांना आज आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पामतेलाचे भाव ५ रुपयांनी, तर सोयाबीन तेलात ३ रुपयांनी वाढ झाली. पामतेलाची आयात ३५.६ टक्क्यांनी, तर सोयाबीन तेलाची ७.९ टक्क्यांनी घटल्यामुळे ही भाववाढ झाल्याचे बोलले जात आहे.
फेब्रुवारीत भारतातील पामतेलाच्या आयातीत नऊ महिन्यांपूर्वीच्या तुलनेत ३५.६ टक्के घसरण झाली. गेल्या जानेवारी महिन्यात पामतेलाची आयात १२.४ टक्के कमी होऊन ७८२,९८३ टन होती. फेब्रुवारी महिन्यात ३५.६ टक्के आवक घटून ५ लाख टनावर आली आहे. सोयाबीन तेलाची आवक ७.९ टक्के कमी होऊन १ लाख ७४ हजार टनावर आली आहे. ऑक्टोबरमध्ये ती तीन लाख ६ हजार टन एवढी होती. सूर्यफुलांची आवक ३४ टक्के वाढून २ लाख ९५ हजार टन झाली आहे.
गेल्या महिन्याच्या तुलनेत पामतेलाची आयात कमी होत असल्याने भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. पामतेल ९५ रुपयांपर्यंत, तर सोयाबीन ९८ रुपयांपर्यंत पोहोचले. पामतेल आणि सोयाबीन तेलाची आवक घटल्यान बाजारात त्याचा परिणाम होत आहे. इंडोनेशिया, मलेशिया येथून १८.४ टक्के आयात घटली आहे. भारताची एकूण तेलाची आयात १८.४ टक्क्यांनी घटली आहे. सध्या भारत प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून पामतेल, अर्जेंटिना, ब्राझील, रशिया आणि युक्रेनमधून सोयाबीन आणि सूर्यफूल खरेदी करीत आहे.