मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती अॅग्रो कंपनी’ने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ‘ईडी’ने जप्तीची शुक्रवारी कारवाई केली. त्यानंतर आज रोहित पवार यांनी सविस्तरपणे आपली बाजू मांडणारी प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली आहे.
रोहित पवार यांनी म्हटले आहे की, युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तळमळीतून एका ‘बच्चा’ने ८०० कि.मी. ची पायी संघर्षयात्रा काढली त्यावेळी ‘यांनी काय संघर्ष केला’ अशी टीका काहींनी केली. त्यांना सांगायचंय की, बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या ‘मित्रा’बरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचते, पण माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे.पण तुम्ही कोणता संघर्ष करुन आणि कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य उभं केलं, हे सांगण्याची हिंमत तुमच्याच आहे का? माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला व तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील पण लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची झलक आत्ताच जागावाटपातही दिसायला लागलीय…
हव्या त्या मंत्रीपदासाठी आणि तिकीटासाठी तुम्ही शंभर दिल्लीवाऱ्या कराल, पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर कधी दिल्लीत आवाज उठवलेला ऐकला नाही…
या कारणामुळे केली कारवाई
‘ईडी’ने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी केल्यानंतर कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. जप्त केलेल्या या कारखान्याची किंमत ही ५० कोटी २० लाख रुपये आहे. ‘ईडी’ने १६१ एकर जमीन जप्त केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आ. पवार यांची ‘ईडी’ने तीन दिवस चौकशी केली होती. सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर ‘ईडी’ने कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला. कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करताना राज्य सहकारी बँकेने राबवलेली प्रक्रिया चुकीची होती, असे ‘ईडी’चे म्हणणे आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी २०१९ मध्ये दिलेल्या निकालाचा अभ्यास करून मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘ईडी’ने कन्नड सहकारी कारखान्याची जमीन, प्लांट, यंत्रसामग्री आणि साखर युनिटची इमारत जप्त केली आहे..