इंडिय दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : भारतीय रेल्वेला मोठे यश मिळाले आहे. मालगडीची गती म्हणजे अगदीच कासवगती, अशी काहीसी ओळख झाली आहे. रेल्वेद्वारे मालवाहतूक करणे म्हणजे अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया असल्याची टीकादेखील रेल्वेप्रशासनावर नेहमीच होत असते. या पार्श्वभूमीवर आता रेल्वेने पूर्ण केलेल्या एका प्रकल्पामुळे महालवाहतूक गतीशील होणार असून त्याचा फायदा रेल्वेसह नागरिकांनाही होणार आहे.
देशातील मालवाहतुकीसाठी तयार होत असलेल्या सर्वात मोठ्या रेल्वे मार्गाचे म्हणजेच समर्पित फ्रेट कॉरिडॉरचे बांधकाम वेगाने पूर्ण झाले. भारतीय रेल्वेने उद्योगांना आश्वासन दिले होते की याद्वारे त्यांचा माल एका शहरातून दुसऱ्या शहरात सहज आणि वेगाने पोहोचू शकेल. तो दिवस अखेर आता आला. भारतीय रेल्वेच्या डीएफसी कॉरिडॉरचा ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आता शंभर टक्के तयार आहे. ईडीएफसी पंजाबमधील लुधियाना ते पश्चिम बंगालमधील सोननगरला जाते. देशातील या अतिशय खास कॉरिडॉरची लांबी १३३७ किमी आहे. ईडीएफसी ५१ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली आहे. मालवाहतुक सुकर होण्याने प्रवाशांना फायदा कसा मिळेल, याबद्दलही समजून घेऊया.
दररोज १४० मालगाड्या
रेल्वेच्या या उपक्रमामुळे वीजगृहांना कोळशाचा पुरवठा जलद होईल. ईडीएफसी दररोज १४० मालगाड्या चालवणार आहे, त्यापैकी ७० टक्के कोळशाच्या गाड्या आहेत. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या वीज प्रकल्पांना याचा फायदा होणार आहे. रेल्वेच्या पश्चिम कॉरिडॉरचेही ७० टक्के काम पूर्ण झाले आहे, जे या आर्थिक वर्षात ९५ टक्के पूर्ण होईल, अशी एक चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वेचा पश्चिम कॉरिडॉर खुर्जा ते जेएनपीटी मुंबईपर्यंत बांधला जात आहे.
प्रवासी गाड्यांनाही फायदा
रेल्वेच्या या कॉरिडॉरवर फक्त मालगाड्याच धावतील. परंतु, प्रवासी गाड्यांनाही याचा फायदा होईल कारण मालगाड्या सामान्य रेल्वे रुळांवरून चालवल्या जातील आणि रुळावरील ताण कमी झाल्यामुळे प्रवासी गाड्याही अधिक वेगाने धावतील आणि प्रवाशांना वेळेवर पोहोचवतील. पॅसेंजर ट्रेन ट्रॅकवरून मालगाड्या कमी केल्या जातील, ज्यामुळे पॅसेंजर गाड्यांची वक्तशीरपणा वाढेल आणि नवीन पॅसेंजर ट्रेनसाठी ट्रॅक क्षमता देखील वाढेल.