इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः मुंबईत जी चर्चा झाली तीच चर्चा पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झाली. त्यात फारसा बदल झाला नसल्याचे समोर आले आहे. आज पहाटेपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात ही महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीती भाजप ३१ ते ३२, शिंदे गट दहा ते बारा तर अजित पवार गट तीन-चार जागा लढवण्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या बैठकीत महायुतीत आलेल्या शिंदे-पवार गटासाठी फारसे मनासारखे काहीच घडले नाही. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. या अनेक नेते उमेदवारी न मिळाल्यास शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यतेवरही चर्चा झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटातील प्रफुल्ल पटेल या बैठकीत सहभागी झाले होते. या नेत्यांची शाह यांच्यासोबतची बैठक सुमारे अडीच तास चालली. शाह यांनी पवार आणि पटेल यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. शिंदे निघून गेल्यानंतर सुमारे २०-२५ मिनिटांनी पवार आणि पटेल बाहेर पडले.
पवार यांच्या राष्ट्रवादीला ३ ते ४ तर शिंदे यांच्या शिवसेनेला १० ते १२ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे.