नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलीस प्रशासनावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. यासोबतच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यात पोलीस प्रशासन आपल्या कर्तव्याप्रती सदैव दक्ष राहून महत्त्वाची भूमिका पार पाडत असते, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
आज जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) नाशिक कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्राप्त 20 नवीन बोलेरो वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, विशेष पोलीस महानिरिक्षक नाशिक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. भुसे यावेळी म्हणाले की, गुन्हेगारीला आळा घालण्याची व नागरिकांच्या सुरेक्षेची पोलीस प्रशासनावर महत्त्वाची जबाबदारी असते. यादृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एकूण 71 चारचाकी व दुचाकी वाहनांच्या खरेदीसाठी 3 कोटी 9 लाख 72 हजार 830 रूपयांचा निधीस मंजूरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी आज प्राप्त झालेल्या 20 नवीन बोलेरो वाहनांच्या माध्यमातून गुन्ह्याच्या ठिकाणी तातडीने व जलदपणे पोहचणे शक्य होणार आहे. नवीन वाहनांमुळे ग्रामीण पोलीस अधिक सक्षमतेने काम करू शकतील असा विश्वास यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी व्यक्त केला. तसेच नाशिक शहर व जिल्ह्यातील पोलीस दलात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सदैव कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री श्री. भुसे यावेळी सांगितले.
पालकमंत्री श्री. भुसे यांनी दिल्या आंतराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पालकमंत्री श्री. भुसे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा मंत्री श्री. भुसे व मान्यवरांच्या हस्ते पुष्प देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी मंत्री श्री. भुसे म्हणाले की, आजच्या युगात महिला पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे महिलांनाही सैन्य दलात संधी प्राप्त झाली आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यात भरतीपूर्व शासकीय प्रशिक्षण संस्था कार्यान्वित झाली आहे. राज्यातून येथे प्रवेशासाठी 6 हजार मुलींनी यात सहभाग घेतला यातून अंतिम टप्प्यात 30 मुलींची निवड करण्यात आली आहे. त्र्यंबकरोड येथील माजी सैनिकांच्या वसतिगृहात या मुलींची रहिवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि पोलीस ट्रेनिंग सेंटर येथे या मुलींच्या प्रशिक्षण सुरू असल्याचे पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.
खासदार हेमंत गोडसे यावेळी म्हणाले की, ग्रामीण पोलीस दलास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्राप्त वाहनांचा निश्चित चांगला उपयोग होणार असून शोध कार्यास गती मिळणार आहे. यावेळी श्री. गोडसे यांनीही स्त्री शक्तीचा गौरव करून जागतिक महिला दिनाच्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विशेष पोलीस महानिरिक्षक नाशिक दत्तात्रय कराळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने यांनी व्यक्त केले. सुरवातीला ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून पालकमंत्री श्री. भुसे यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर पालकमंत्री यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन 20 बोलेरो वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.