इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः लोकसभा जशा जशा जवळ येऊ लागल्या तशा उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागल्या आहे. कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराचा पत्ता कट करेल हे सांगणे सुध्दा अवघड आहे. पण, भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये राज्यातील १२ खासदारांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आता जोर धरु लागल्यामुळे विद्यमान खासदारांचे धाबे दणाणले आहे. यात नगरचे खासदार खा. डॉ. सुजय विखे पाटील, जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांच्यासह १२ जणांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणातून खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आले. खासदारांच्या कामाचे तीन सर्वेक्षण करण्यात आले. डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याने त्यांचा पत्ता निवडणुकीच्या रिंगणातून कट होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप धक्कातंत्र अवलंबणार आहे. अनेक विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून त्यांच्याजागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
नांदेड, बीड, धुळे, सोलापूर, सांगली, लातूर, अहमदनगर, जळगाव, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, वर्धा, रावेर आदी मतदार संघांतील खासदारांची कामगिरी चांगली नसल्याचे भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. आता या खासदारांचा पत्ता जर खरंच कट झाला तर याजागेवर कोण उमेदवार असेल याची चर्चा रंगली आहे.