इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली : काँग्रेस निवडणूक समितीने दहापैकी सहा राज्यांतील बहुतांश उमेदवारांना अंतिम रूप दिले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास बैठक संपल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल म्हणाले, लवकरच औपचारिक घोषणा केली जाईल.
राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून, माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल छत्तीसगडमधील राजनांदगावमधून आणि ज्योत्स्ना महंत कोरबामधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. छत्तीसगडमधील सर्व प्रमुख नेते रिंगणात असतील. सूत्रांनी सांगितले की, पक्ष केरळमधील २० पैकी १६ जागांवर निवडणूक लढवणार असून माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर हेही उमेदवार असतील.
कर्नाटकातील उमेदवारांमध्ये पक्षाचे खासदार डीके सुरेश यांचा समावेश आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कलबुर्गी या जागेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. समितीची सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे.