नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जागतिक महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध लेखक आणि इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्ष सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड केली आहे. राष्ट्रपतींना देशात १२ जणांची राज्यसभेवर निवड करण्याचा अधिकार आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मोदी यांनी ही घोषणा केली. आपल्या एक्स अकाऊंटवरून मोदी यांनी ही माहिती दिली आहे. मूर्ती यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला होता. मूर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष असून त्या टाटा कंपनीत रुजू होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अभियंत्या आहेत. त्यांचा विवाह नारायण मूर्ती यांच्याशी झाला. त्यानंतर त्यांनी ‘इन्फोसिस’ ची स्थापना केली. ‘इन्फोसिस’च्या निर्मितीत सुधा यांचाही मोठा सहभाग आहे. सुधा यांचे दागिने घेऊन त्यातून नारायण मूर्ती यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने इन्फोसिसची मुहूर्तमेढ रोवली.
सुधा मूर्ती या शिक्षक आणि लेखक आहेत. त्यांची अनेक पुस्तके बेस्ट सेलरच्या यादीत आहेत. आपल्या साध्या आणि पारंपारिक मूल्ये जतन करणाऱ्या स्वभावामुळे त्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कन्या अक्षता हिच्याशी लंडनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा विवाह झाला आहे. सामाजिक कार्य, सामाजिक बांधीलकी आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. सुधा मूर्ती यांनी गेल्या तीस वर्षांत त्यांनी एकही नवीन साडी घेतलेली नाही.