पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आलेल्या कोरेगाव पार्क येथील फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामाच्या फायर अलार्ममध्ये झालेला तांत्रिक बिघाड भारत निवडणूक आयोगाच्या अनुमतीने आणि राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत दुरूस्त करण्यात आला असून सर्व ईव्हीएम यंत्र सुस्थितीत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामात लोकसभा निवडणूकीसाठी वापरण्यासाठी प्रथमस्तरीय तपासणी झालेले ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास या गोदामातील फायर अलार्ममध्ये बिघाड होऊन सायरन अचानक वाजण्यास सुरूवात झाली. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ याची माहिती प्रशासनाला दिली आणि अग्निशमन सिलेंडर्स तिथे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन वाहनही मागविण्यात आले. गोदामाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तपासणी नंतर तंत्रज्ञांनी फायर अलार्ममधील तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले. या प्रकाराची माहिती तात्काळ निवडणूक आयोगाला पाठविण्यात आली व बिघाड दुरुस्त करण्यासाठी परवानगी घेण्यात आली.
निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर सकाळी १०.३० वाजता राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांच्या समक्ष गोदाम उघडण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गोदमच्या आतील सर्व यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री करून बिघाड दुरुस्त करण्यात आला. राजकीय पक्ष प्रतिनिधींनादेखील याबाबत माहिती देण्यात आली. संपूर्ण प्रक्रीयेचे व्हिडीओ चित्रीकरणदेखील करण्यात आले असून याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडून तांत्रिक बाबी संदर्भात अहवाल मागविण्यात आला असून तो प्राप्त होताच अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यादृष्टीने आवश्यक खबरदारीच्या अतिरिक्त उपाययोजना करण्यात येतील असे जिल्हा निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ईव्हीएम सुरक्षेबाबत प्रशासनातर्फे विशेष खबरदारी
गोदामात अग्निशमन यंत्रणा आहे आणि कडक सुरक्षा व्यवस्थादेखील आहे. तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या या प्रकाराची माहिती प्रशासनाने निवडणूक आयोगाला दिली असून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमक्ष आवश्यक दुरूस्ती करण्यात आली आहे. सर्व ईव्हीएम यंत्र सुस्थितीत आहे. ईव्हीएम सुरक्षेबाबत प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
डॉ.सुहास दिवसे, जिल्हाधिकारी