नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वैद्यनगर भागातून आपल्या घराच्या दिशेने पायी जात असतांना वयोवृध्द शिक्षकास तोतया पोलीसांनी गंडा घातला. पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी रूमालात सोनसाखळीसह अंगठ्या बांधण्यासाठी मदत करत सुमारे सव्वा लाख रूपये किमतीचे अलंकार हातोहात लंपास केले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आण्णासाहेब वामन चौधरी (७९ रा. वृंदावन कॉलनी,जनरल वैद्यनगर) यांनी फिर्याद दिली आहे. चौधरी सेवानिवृत्त शिक्षक असून ते गुरूवारी (दि.७) सकाळच्या सुमारास परिसरात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. फेरफटका मारून ते जनरल वैद्यनगर भागातून आपल्या घराच्या दिशेने पायी जात असतांना दुचाकीस्वार भामट्यांनी त्यांची पोलीस असल्याची बतावणी करीत वाट अडविली.
यावेळी संशयितांनी सध्या परिस्थिती खराब आहेत दागिणे घालून फिरू नये असा सल्ला देत अलंकार रूमालात बांधून देण्यासाठी मदत करीत सोनसाखळी व दोन अंगठ्या असे सुमारे १ लाख २० हजार रूपये किमतीचे अलंकार हातोहात लांबविले. काही अंतरावर जावून चौधरी यांनी रूमालाची चाचपणी केली असता हा प्रकार समोर आला असून अधिक तपास उपनिरीक्षक मुस्तफा शेख करीत आहेत.
…….