इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत शंभर रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
मोदी यांनी ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्म’ एक्सवर ही माहिती दिली. ते म्हणाले, “आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत शंभर रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिलांचे आयुष्य सुसह्य होईल.’’ मोदी यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, की महिला शक्तीच्या सामर्थ्याला, धैर्याला आणि लवचिकतेला सलाम करतो आणि त्यांच्या विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे कौतुक करतो. आमचे सरकार शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत आहे. कृषी, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील उपक्रमांद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
यापूर्वी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेत सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरवरील ३०० रुपयांच्या अनुदानात एक वर्षासाठी वाढ केली होती. सुमारे दहा कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या लाभार्थ्यांना वर्षभरात १२ सिलिंडरवर सबसिडी मिळणार आहे. दिल्लीत १४ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ९०३ रुपये आहे. १०० रुपयांच्या सवलतीनंतर त्याची किंमत ८०३ रुपये होईल, तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान दिल्यानंतर त्याची किंमत ६०३ रुपये होईल.