नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– वडाळारोडवरील रेहनुमा नगर भागात रस्त्याने पायी जाणाऱ्या इसमाच्या हातातील रोकड असलेली बॅग दुचाकीस्वारांनी पळविल्याची घटना घडली. या बॅगेत नऊ लाख रूपयांची रोकड होती. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हनीफ अफसर कुरेशी (रा.रेहनुमानगर,वडाळारोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कुरेशी यांचा डेअरी फार्मचा व्यवसाय असून बुधवारी (दि.६) दुपारी ते आपल्या व्यवसायाची रक्कम घेवून नजीकच असलेल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली.
घर परिसरात दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करून हातातील बॅग हिसकावून नेली. या बॅगेत नऊ लाख रूपयांची रोकड होती. अधिक तपास जमादार सोनार करीत आहेत.