नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे येथे आज ७ मार्च पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( सिनियर इन्व्हिटेशन लीग ) टी-ट्वेंटी सामन्यात नाशिकने परभणीवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. कर्णधार मुर्तुझा ट्रंकवालाने नाबाद ७२ धावा तसेच तन्मय शिरोडेने ३ तर सत्यजित बच्छाव व प्रतिक तिवारीने प्रत्येकी २ बळी घेत विजयात मोठा वाटा उचलला.
प्रथम फलंदाजी केलेल्या परभणी संघास नाशिकने १९.२ षटकांत १०४ धावांत रोखले. नाशिकचे डावखुरे फिरकी गोलंदाज तन्मय शिरोडेने ३ तर सत्यजित बच्छाव व प्रतिक तिवारी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. समाधान पांगारे व कृष्णा केदार या जलदगती गोलंदाजांनीही प्रत्येकी १ बळी घेतला. विजयासाठी १०५ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवालाने केवळ ४१ चेंडूत ४ षटकार व ९ चौकारांसह नाबाद ७२ धावा फटकावत नाशिकला १० .२ षटकांतच ८ गडी राखून विजयी केले.
संक्षिप्त धावफलक – नाशिक विरुद्ध परभणी – परभणी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी.
परभणी –सर्वबाद १०४ (१९.२ षटके) वि नाशिक – २ बाद १०७ (१० .२ षटके ) .