वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
‘अगं बाई अरेच्चा’, ‘बाईपण भारी देवा’ या सुपर हिट मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे केदार शिंदे यांनी नुकतेच महिला दिनाचे औचित्य साधून एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. प्रेक्षकपसंती आणि आर्थिक कमाई दोन्ही बाबतीत वरचढ ठरलेल्या या चित्रपटांनंतर केदार शिंदे यांनी त्यांच्या ‘आईपण भारी देवा’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आईपण या महत्त्वाच्या नाजूक विषयावर हा चित्रपट करणार असल्याचे केदार शिंदे यांनी सांगितले.
नव्या चित्रपटातून आईपण निभावणाऱ्या स्त्रीच्या भावभावनांची मांडणी करणार असल्याचे केदार शिंदे यांनी स्पष्ट केले. ‘आईपण भारी देवा’ या चित्रपटासाठीही केदार शिंदे यांनी जिओ स्टुडिओजशी करार केला असून ‘बाईपण भारी देवा’च्या लेखिका वैशाली नाईक यांच्याबरोबर ओमकार मंगेश दत्त, तसेच निर्माती ज्योती देशपांडे, बेला शिंदे आणि अजित भुरे हे सहनिर्माते, हाच ग्रुप ‘आईपण भारी देवा’साठी एकत्र आला आहे.
आईपण भारी देवा’ या चित्रपटातील कलाकारांची नावं अजून समोर आले नाहीत परंतु लवकरच ही सर्व माहिती मिळेल असे टीम तर्फे सांगण्यात आले आहे. असे असले तरी बाईपण भारी देवा यातीलच बरेच कलाकार यातही असतील असे बोलले जात आहे.