इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : संरक्षणाचा विश्वास, सुरक्षेची हमी, न्याय मिळेल ही अपेक्षा म्हणजे खाकी वर्दी होय. समाजातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी असलेली खाकी बरेचदा बदनाम होत असते. तशा घटना सातत्याने घडत असतात. असाच एक प्रकार एटीएस अधिकाऱ्याने महिलेसोबत केलेल्या दुष्कृत्याच्या रूपाने पुढे आला आहे.
राज्य दहशतवादविरोधी विभागातील (एटीएस) एपीआय विश्वास पाटील विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तपासा दरम्यान मदत करणाऱ्या महिलेशी ओळख वाढवून पाटीलने तिला थंड पेयातून गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याचे पीडितीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढे याचे रेकॉर्डिंग करून व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी ब्लॅकमेल करून अत्याचार सुरू होते. अखेर, पाटीलचे अत्याचार वाढल्याने महिलेने पोलिसांत धाव घेत अत्याचाराला वाचा फोडली. या प्रकरणात आझाद मैदान पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.
२०१९ साली विश्वास पाटील एटीएसमध्ये काम करत असताना गुंड रवी पुजारी प्रकरणात काम करत असताना त्यांनी महिलेची आणि पाटीलची भेट झाली. त्यानंतर पाटील यांनी महिलेशी मैत्री वाढवली. त्याने तिला पोलिस खात्याकडून आणखी व्यवसाय देण्याचे आश्वासन दिले. मैत्री वाढत गेल्यानंतर महिलेसमोर त्यांनी आपले प्रेम व्यक्त केले. तेव्हा पीडित महिलेने नकार दिला. त्यावेळी पाटील काम करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलच्या निरीक्षकाकडे तिने याबाबत तक्रार केली. तक्रार केल्यानंतर तेथील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडे तक्रार करू नका, असे सांगण्यात आल्याची माहिती आझाद मैदान पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
फोटो व्हायरल करण्याची धमकी देत घेतला गैरफायदा
आरोपीने पीडितेच्या कुटुंबाला मारण्याची धमकी देत तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी दिली. या धमकीचा गैरफायदा घेऊन आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटीलने पीडित महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला असल्याचा आरोप आहे.