नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –महिला दिन व महाशिवरात्रीच्या निमित्ताने रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने दि.८ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी विशेष आरतीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रेरणादायी वक्त्या आणि ट्रान्सफॉर्मेशनल ट्रेनिंग एक्सपर्ट रामभाऊ म्हळगी प्रबोधिनीच्या श्रीमती प्रिया सावंत यांच्या हस्ते हिंदी आरती व हिंदी सवाईच लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने नियमित गंगा गोदावरी आरतीस प्रारंभ करण्यात आला असून नाशिककर तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.समितीच्या वतीने शिवरात्री निमीत्ताने विशेष आरतीच्या निमित्ताने समस्त महिला वर्ग व भक्तांच्या मुख कमल द्वारा सामूहिक शिवस्तुतीचे पठण होणार आहे .या करीता सर्व भाविकांनी सामुदायिक स्तुती करीता एकत्र येऊन देशा करिता प्रार्थना करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
श्री. गंगा गोदावरी आरती ही मराठीत रेकॉर्डिंग केली आहे. परंतु या आरतीस प्रारंभ झाल्यापासून नाशिकमधील तसेच देशातील विविध प्रांतातील भाविकांची संख्या वाढलेली असून त्यांच्या आग्रहामुळे सर्वाना समजावी अशी हिंदी आरती व हिंदी सवाई निर्माण करण्यात आली आहे. या हिंदी आरतीचे व हिंदी सवाईचे लोकार्पण आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रेरणादायी वक्त्या आणि ट्रान्सफॉर्मेशनल ट्रेनिंग एक्सपर्ट रामभाऊ म्हळगी प्रबोधिनीच्या श्रीमती प्रिया सावंत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. ही ३३ वी विशेष महाआरती होईल अद्भूत पर्व असणार आहे. महिलांचा आरती मधील सहभाग देखील अतिशय मोठा असणार आहे.
या सोहळ्यास नाशिक मधील जास्तीत जास्त महिलांचा सहभाग त्या दिवशी असावा म्हणून नाशिक मधील महिला उद्योजक, बचत गट, गृहिणी, महाविद्यालयीन मुली आणि महिलांच्या समूहाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.