इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर: दोन महिन्यापूर्वीच शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्यांतर्गत रात्री उशिरा ड्युटी करून परतणाऱ्या वाहतूक विभागाच्या पोलीस हवालदाराला लकडगंज पोलीस ठाण्याच्या मद्यधुंद पोलीस हवालदाराने जबर मारहाण केली होती, ही बाब गांभीर्याने घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मारहाण करणाऱ्या हवालदाराला निलंबित केले होते. त्याचप्रमाणे जळगाव, पुणे, कोल्हापूर, अकोला या जिल्हा व शहराच्या हद्दीमध्ये देखील गेल्या वर्षभरात अनेक विभागात कार्यरत असलेल्या असलेल्या सुमारे दोन ते चार पोलिसांनी दारू पिऊन गोंधळ घातल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यातच आता पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना घडली आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दोघेही दारूच्या नशेत होते…
गेल्या काही दिवसांमध्ये नागपूर शहर व जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, परंतु यावर पोलिसांचा वचक नाही असे म्हटले जाते. कारण काही पोलीसच गैरवर्तन व मद्यपान करीत असल्याने गुन्हेगारांना त्यांचा धाक राहिलेला नाही, त्यातच आता आणखी ही घटना घडली आहे
रात्रीच्या सुमारास शैलेंद्र नागरे नेहमीप्रमाणे दारू पिऊन वाहनचालक रवी साठवणे याला अश्लील शिवीगाळ करीत होता. या नेहमीच्या प्रकारामुळे संतापलेल्या रवीने त्याच्या कानशिलात लगावली. पुढे दोघांत मारामारी झाली. यावेळी रवी साठवणे सुद्धा नशेतच होता. त्यामुळे आपण काय करतो याचे दोघांनाही भान राहिले नव्हते, हा गोंधळ वाढतच गेला. याबाबत बातमी प्रकाशित होताच, पोलिस दलात मोठी खळबळ उडाली.
दोन्ही पोलिस कर्मचारी निलंबित
नागपूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी ड्युटीवर असताना असे गैरवर्तन करणाऱ्या हेड कॉन्स्टेबल शैलेंद्र नागरे व वाहनचालक रवी साठवणे दोन्ही पोलिसांना निलंबित केले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.