इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोणावळाः मला ‘शरद पवार’ म्हणतात. माझ्या वाटेला गेलात, तर मी कोणाला सोडत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आ. सुनील शेळके यांना इशारा दिला आहे.
आ. शेळके यांना उद्देशून ते म्हणाले, की मला असे समजले, की तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांन ते येथे येतात, म्हणून धमकी दिली. शेळके तू कोणामुळे आमदार झाला, तुझ्या सभेला कोण आले होते. पक्षाचा अध्यक्ष कोण होते? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेव. यापुढे असे काही केले, तर मला शरद पवार म्हणतात. मी त्या वाटेने जात नाही; पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही, असे त्यांनी ठणकावले.
यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मुंबईत आदर्श सोसायटीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हात आहे, असा आरोप भाजपने केल्यानंतर ते सातव्या दिवशी भाजपमध्ये गेले. पंधराव्या दिवशी भाजपचे खासदार झाले. राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर आपण चौकशी करण्याचे आव्हान दिले होते. परंतु ज्यांच्यावर आरोप केले आज ते भाजपमध्ये आहेत. भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे. आरोप करा आणि पक्ष प्रवेश देऊन आरोप धुवून काढा, असे त्याचे राजकारण आहे, अशी टीका त्यांनी केली.