नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- क्रेडिट कार्डची गोपनिय माहिती मिळवीत सायबार भामट्यांनी नाशिकच्या तीन जणांना तब्बल साडे आठ लाख रूपयांला गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रेडिट कार्ड ॲक्टीव्ह करण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे.
बाळासाहेब सुकदेव जाधव (रा.गुलमोहर कॉलनी,आनंदनगर,मुक्तीधाम मागे ना.रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जाधव यांच्यासह शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोघांना गेल्या जुलै महिन्यात भामट्यांनी संपर्क साधला होता. आयसीआयसीआय आणि एसबीआय बॅंकेतून बोलत असल्याचे भासवून भामट्यांनी क्रेडिट कार्ड ॲक्टीव्ह करण्याचा बहाणा केला.
सायबर भामट्यांनी दाखविलेल्या विश्वासास बळी पडलेल्या तिघांनीही आपल्या क्रेडिट कार्डची गोपनिय माहिती दिल्याने ही फसवणुक झाली असून, ६ जुलै ते १७ नोव्हेंबर दरम्यान भामट्यांनी कार्ड नंबर ओटीपी, सीव्हीव्ही नंबर आदींचा वापर करीत संबधीच्या क्रेडिट कार्डचा वापर करून ८ लाख ५२ हजार २६९ रूपयांची फसवणुक केली आहे. याबाबत एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.