लातुर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपच्या आता लक्षात आलं आहे, महाराष्ट्रात मोदींचं नाणं चालू शकत नाही. मोदी खोटा सिक्का आहेत, म्हणून त्यांनी शिवसेना फोडली असा आरोप माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. ते लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात एका सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती हल्ला केला.
या सभेत शिवसेना फुटीवर बोलतांना ते म्हणाले की, ज्या ज्या वेळी पाठीवर वार होतो, त्यावेळी दुश्मनाचा कोथळा काढण्याची शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. आता निवडणुकांची वाट जनता बघत आहे. त्यात भाजपला संपवून, गाडून, मूठमाती देऊन शिवसेना पुढे जाईल; पण शिवसेना संपणार नाही.
यावेळी त्यांनी जाहिरातीवरही टीका केली. घटनाबाह्य सरकारसारखी ८४ कोटी रुपयांची जाहिरात करण्यापेक्षा, त्या पैशात मी माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला भाव दिला असता. निवडणूक रोख्यांमधून भाजपने हजारो कोटी जमवले. मग देशाला लुटलं कुणी? असा प्रश्नही त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी मोदीजींनी ‘मेरा परिवार‘ म्हटलंय, पण त्या परिवाराची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थितीत करत त्यांनी टीका केली.