नाशिक (इंडिय दर्पण वृत्तसेवा)- जेलरोड भागात दुचाकीस्वार वृध्दास अपघात झाल्याची बतावणी करीत बुलेटस्वार तोतया पोलीसांनी सोनसाखळीसह अंगठी लांबविल्याची घटना घडली. अपघातग्रस्त इसमाच्या अंगावरील दागिणे लंपास झाल्याची बतावणी करीत भामट्यांनी मदतीचा बहाणाकरून सुमारे ९० हजार रूपये किमतीचे अलंकार हातोहात लंपास केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय दामू चौधरी (६७ रा.सातभाईनगर,जेलरोड) यांनी फिर्याद दिली आहे. चौधरी मंगळवारी (दि.५) सकाळच्या सुमारास महालक्ष्मीनगर येथील बसस्टॉप भागातून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. मटन मार्केट जवळ थांबलेल्या बुलेटवरील दोघा भामट्यांनी त्यांना थांबविले. यावेळी पोलीस असल्याची बतावणी करून संशयितांनी पुढे अपघात झाला असून, जखमी इसमाच्या गळयातील दागिणे कोणी तरी काढून घेतले आहेत.
त्यामुळे तपासणी सुरू आहे. तुम्ही तुमचे अलंकार काढून सुरक्षीत ठेवा असा सल्ला देत भामट्यांनी कागदाच्या पुडीत लॉकिट व अंगठी ठेवण्यास मदत केली. यानंतर कागदी पुडी दुचाकीच्या डिक्कीत ठेवण्याचा बहाणा करून अलंकार हातोहात लंपास केले. चौधरी यांनी घरी जावून कागदी पुडी उघडून बघितली असता त्यात माती निघाल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.