इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क
मुंबईः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा आहे. यात महायुतीत ३२ जागा भाजप, शिवसेना दहा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला हे जागा वाटप मान्य नसल्याचेही बोलले जात आहे. दुसरीकडे भाजप २८, शिंदे गट १६ व अजित पवार गटाला ४ जागा देणार असल्याचेही चर्चा आहे.त्यामुळे नेमकी चर्चा कोणती खरी हे जागा वाटप झाल्यानंतरच समोर येणार आहे.
भाजपने लोकसभेत राज्यातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा चंग केला आहे. त्यात मित्र पक्षाला लोकसभेत झुकते माप न देता विधानसभेत द्यावे असे ठरले आहे. पण, मित्र पक्ष लोकसभेतही जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी आग्रही आहे. भाजपने अब की बार ४०० पार असा नारा दिला आहे. त्यामुळे त्यांनी ठिकठिकाणी सुक्ष्म सर्व्हेक्षण करुन नियोजन तयार केले आहे. कोणताही धोका पत्करायला भाजप तयार नाही. सर्वाधिक जागा भाजपच्या चिन्हावर लढण्याची व्यूहनीती भाजपने आखली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर राज्यातील जागांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
दरम्यान, भाजप लोकसभच्या ३० ते ३२, शिंदे गटाला दहा ते बारा तर अजित पवार गटाला सहा ते आठ जागा सोडल्या जातील, असे शाह यांनी महायुतीतील नेत्यांना सांगितल्याचे समजते. चारशेचे टार्गेट घेऊन कामाला लागा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. अजित पवार हे रायगड, परभणी, बारामती, शिरूर आणि आणखी दोन जागांसाठी आग्रही आहेत. तेवढ्या जागा सोडण्याची भाजपने तयारी दाखवली आहे. काही जागांवर शिंदे-अजितदादांचे उमेदवार भाजपच्या चिन्हावरही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.