नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सहाय्यक संचालकाची बनावट साक्षरी करून वाहनचालकाने परस्पर दहा लाखाचे कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विभागीय माहिती कार्यालयात हा प्रकार घटला आहे. या कर्ज प्रकरणासाठी चालकाने कार्यालयीन लेटर हेड आणि शासकीय शिक्क्याचा गैरवापर केला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
राजू आण्णा चौघुले असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित वाहन चालकाचे नाव आहे. याबाबत सहाय्यक सचालक मोहिनी राणे यांनी फिर्याद दिली आहे. राणे या येथील विभागीय माहिती कार्यालयात सहाय्यक संचालक पदावर कार्यरत असून राजू चौगुले हा याच कार्यालयाचा वाहन चालक आहे. चौघुले यांनी त्यांच्या कार्यालयातील मंत्रालय को-ऑपरेटिव बँकेकडून १० लाखांचे कर्ज मंजुरीसाठी तसेच कजार्चा हप्ता वेतनातून कपात व्हावा, यासाठी कार्यालयाचे लेटर हेड आणि शासकीय गोल शिक्का याचा बेकायदा वापर केला. तसेच कार्यालयाच्या सहाय्यक संचालक माहिती अधिकारी मोहिनी राणे यांची बनावट सही करून बँक आणि विभागीय माहिती कार्यालय, सहाय्यक संचालक माहिती यांची फसवणूक केली.
उपसंचालक ज्ञानोबा इगवे यांनी या कर्ज प्रकरणाबाबत खात्री केली असता हा प्रकार समोर आला. राणे यांनी अशा कुठल्याही प्रकारचे पत्र दिले नसून त्यावरील सही बनावट असल्याचे म्हटले आहे. राणे यांनी याबाबत वरिष्ठांना याबाबत अहवाल सादर केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित वाहन चालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.