नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता येथे 15,400 कोटी रुपयांच्या बहुविध ‘कनेक्टिव्हिटी’ प्रकल्पांचे लोकार्पण केले तसेच काही प्रकल्पांची पायाभरणी केली. शहरी वाहतूक क्षेत्राला पूरक असलेल्या विकास प्रकल्पांमध्ये मेट्रो रेल्वे आणि प्रादेशिक जलद परिवहन प्रणाली (आरआरटीएस) यांचा समावेश आहे.
पंतप्रधानांनी सर्व मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेतला आणि कोलकात्यामध्ये भारतातील पहिल्या पाण्याखालून धावणाऱ्या मेट्रोने, एस्प्लेनेड – हावडा मैदान मेट्रो मार्गावर प्रवास केला. या मेट्रो प्रवासादरम्यान त्यांनी श्रमिक आणि शाळकरी मुलांशीही संवाद साधला. एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये, पंतप्रधान म्हणाले: “या प्रकल्पावर काम करणारी श्रमजीव मंडळी आणि तरुणांचा सहवास मिळाला, त्यांच्याशी संवाद साधला; त्यामुळे मेट्रोचा हा प्रवास संस्मरणीय बनला. हुगळी नदीखालच्या बोगद्यातूनही आम्ही प्रवास केला.”
“कोलकातावासीयांसाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. कोलकाता शहरात मेट्रोच्या जाळ्याचा लक्षणीयरीत्या विस्तार झाल्यामुळे दळणवळणाला चालना मिळेल आणि वाहतुकीची कोंडी कमी होईल. हावडा मैदान-एस्प्लेनेड मेट्रो विभागात देशातील एका मोठ्या नदीखाली मेट्रो वाहतुकीसाठीचा पहिला बोगदा विकसित करण्यात आला आहे हा एक अभिमानाचा क्षण आहे. कोलकाता मेट्रोचे हे अविस्मरणीय क्षण आहेत. मी जनशक्तीला अभिवादन करतो आणि नव्या जोमाने त्यांची सेवा करत राहीन अशी ग्वाही देतो. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंदा बोस यावेळी उपस्थित होते.