नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाणे येथील विवाह इच्छुक तरूणाने मुलीच्या आईशी मोबाईलवर अश्लिल संभाषण करीत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी ही कारवाई केली. मुलीसाठी ऑनलाईन विवाहस्थळ शोधणा-या कुटुंबियांना हा अनुभव त्रासदायक ठरला..
या प्रकरणी विवाहइच्छुक असलेला मुलगा माधव जोशी यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्र्यंबकरोड भागात राहणा-या पीडितेच्या पतीने फिर्याद दिली आहे. पीडित दांम्पत्य आपल्या मुलीच्या विवाहासाठी ऑनलाईन वराचा शोध घेत होते. या काळात त्यांचा संपर्क संशयिताशी आला. वधूवरांसह कुटुंबियांनी एकमेकांशी मोबाईलवर बोलणे केले. वधूच्या आईनेही वेळोवेळी वराशी संपर्क साधत चांगलीच चौकशी केले.
दोघांमध्ये व्हॉटसअपच्या माध्यमातून संदेशाच्या माध्यमातून खुशालीसह अन्य बाबींवरही चर्चा झाली. मुलीस चांगले स्थळ मिळाल्याचा आनंद या कुटुंबियात असतांनाच संशयिताने होणा-या सासूशी अश्लिल संभाषण सुरू केले. प्रारंभी महिलेने याकडे दुर्लक्ष केले मात्र कालांतराने संशयिताचा अतिरेक वाढल्याने तिने आपल्या पतीकडे याबाबत वाच्यता केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक भटू पाटील करीत आहेत.