इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्राचा दौ-यामुळे आता महायुतीमधील जागा वाटपाला आता वेग येणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप ४८ पैकी ३२ जागा लढणार असल्याचे संकेत या दौ-यात देण्यात आले. मित्र पक्षांना लोकसभेपेक्षा विधानसभेत झुकते माप द्या असे सांगत त्यांची बोळवण केली जाणार असल्याची रणनिती निश्चित झाली आहे. या दौ-यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात त्याबाबत खलबते झाली.
शाह यांनी रात्री तब्बल तीन तास चाललेल्या बैठकीत फडणवीस व बावनकुळे यांच्याकडून राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांचा आढावा घेतला. कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे ४५ खासदार निवडून आणायचे असून ३२ ते २४ जागा भाजप लढवेल, असे शाह यांनी नेत्यांना सांगितले असले तरी भाजप ३२ जागांवर ठाम राहणार आहे.
मंगळवारी रात्री मुंबईतही याच मुद्यांवर शाह यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यांशी चर्चा केली. निवडून येण्याची क्षमता हाच निकष मानून उमेदवार निश्चित करा, असे शाह यांनी सांगितले. या बैठकीत पंकजा मुंडे यांना आता बीडमधून संधी देण्याचे संकेत शाह यांनी दिले आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे पक्ष फाटाफुटीमुळे मोडकळीस आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात ‘शत प्रतिशत भाजप’ करण्याची ही चांगली संधी असल्याचे सांगत त्यांनी ४५ जागा जिंकून आणण्याचे आवाहन या बैठकीत केले.