इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जर तुम्ही वेगवान गोलंदाज आहात, तर ही सुवर्णसंधी तुम्ही दवडू नका. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांचा शोध घेण्यासाठी ‘महा स्पीडस्टार: शोध महा वेगाचा’ ही शोध मोहीम हाती घेतली आहे. ९ ते ३१ मार्च दरम्यान राज्यातील पाच ठिकाणी होणाऱ्या या शोध मोहिमेत तुम्ही सहभाग घेऊन तुमचे कौशल्य दाखवू शकता. या मोहिमेची अधिकृत घोषणा झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातून यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत हजारो खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिकृत वेबसाईटवर (www.cricketmaharashtra.com) जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी कोचिंग समिती नियुक्त करण्यात आली आहे. यामध्ये समद फल्लाह, चारुदत्त कुलकर्णी, शिरीष कामठे, अनुपम संकलेचा, आदित्य डोळे, राजेश माहूरकर, प्रसाद कानडे, सुयश बुरकुल, अविनाश आवारे, मनीषा लांडे व कीर्ती धनवान यांचा समावेश आहे. तसेच टॅलेंट हंट कमिटीमध्ये दिनेश कुंटे, प्रभाकर मोरे, शिवा अकलुजकर व समीर रकटे यांचा समावेश आहे. “ही स्पर्धा विनामूल्य असून अधिकाधिक खेळाडूंनी यामध्ये सहभागी व्हावे”, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष श्री. रोहितदादा पवार यांनी केले आहे.
या उपक्रमात पुरुष व महिला या दोन्हींच्या वरिष्ठ व कनिष्ठ गटातील खेळाडू सहभागी होऊ शकतात. या दोन्ही गटातील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके मिळणार आहेत. त्याचबरोबर या खेळाडूंना महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि महिलांची महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये यायची संधी मिळेल. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गुणी गोलंदाजांवर प्रशिक्षक विशेष लक्ष ठेवून असतील. त्या गुणी खेळाडूंसाठी आगामी काळात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे वर्षभर विशेष प्रशिक्षण शिबिर विनामूल्य राबवले जाईल. त्यामुळे ही केवळ शोध मोहीम नसून भविष्यात क्रिकेट विश्वाला दर्जेदार, सर्वात वेगवान गोलंदाज मिळावेत, यासाठीची एक चळवळ आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
९ व १० मार्च
नाशिक: गोल्फ क्लब ग्राउंड
संभाजी नगर: एडीसीए क्रिकेट ग्राउंड
१६ व १७ मार्च
नांदेड: नांदेड स्टेडियम
सोलापूर: इंदिरा गांधी स्टेडियम
२३ व २४ मार्च
पुणे: गहुंजे स्टेडियम
महाअंतिम फेरी
३१ मार्च
पुणे: गहुंजे स्टेडियम