शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासनाच्या मुद्रांक अभय योजनेचा पहिला टप्पा २९ फेब्रुवारी रोजी पुर्ण झाला असून १ मार्च पासून ३१ मार्च पर्यंत या योजनेचा दुसरा टप्पा राबविला जात आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
मुद्रांक अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यात विविध प्रकारच्या दस्त प्रकरणी १८० कोटीहून अधिक रुपयांचे शुल्क माफ करत नागरिकांना शासनाने मोठा दिलासा दिला असून १७३ कोटीहून जास्त रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांना मुद्रांक शुल्क आणि दंडाच्या रकमेतून अभय मिळत ‘मुद्रांक अभय योजनेला’ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सुद्धा महसूल मंत्री म्हणाले.
मालमत्ता दस्त नोदंणी आणि मुद्रांक शुल्क प्रकरणात असलेली अनियमिता दुर करण्यासाठी आणि थकित महसूलाची वसूली करण्यासाठी शासनाने डिसेंबर महिन्यात मुद्रांक अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डिसेंबर ते मार्च या महिन्यांत दोन टप्प्यात ही योजना राबवण्याचे ठरविले. या योजनेचा पहिला टप्पा १ डिसेंबर ते ३१ जानेवारी पर्यंत होता त्यात १ लाखापर्यंत मुद्रांक शुल्क तथा दंड असल्यास पुर्णपणे माफ केला जाणार होता. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना याचा फायदा व्हावा यासाठी महसूल मंत्री विखे पाटील यांनी या टप्प्याला आणखी एक महिना मुदत वाढ देऊन, योजनेचा पहिला टप्पा २९ फेब्रुवारी पर्यंत राबविण्याचे निर्देश दिले. या टप्पात शासनाकडे एकुण ५३ हजार ८०० अर्ज दाखल झाले. त्यातून शासनाला १७३ कोटी ३३ लाख ५५ हजार ७२८ रुपयांचा महसूल मिळाला. तर १०० टक्के शुल्क आणि दंडात माफी दिलेल्या प्रकरणात, मुद्रांक शुल्काचे ५४ कोटी ४३ लाख २७ हजार १४७ रुपये तर दंडाचे १२५ कोटी ८१ लाख ७५ हजार २५२ रुपये अशा प्रकारे एकुण १८० कोटी २५ लाख २ हजार ३९९ रुपये शासनाने माफ केले. ही योजना निवासी, अनिवासी औद्योगिक वापराच्या प्रयोजनासाठी केलेले सर्व व्यवहार, विक्री करारपत्रे, भाडेपट्ट्याचे सर्व दस्त, विक्री प्रमाणपत्र, बक्षिसपत्र तारण यासाठा लागू आहे.
१ मार्च पासून अभय योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. दुसरा टप्पा १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत राबविला जाणार आहे. यामध्ये १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० पर्यंतच्या दस्त नोंदणी प्रकरणात एक लाखापर्यंत मुद्रांक शुल्क आणि दंड असल्यास मुद्रांक शुल्क आणि दंडाच्या रकमेत ८० टक्के माफी दिली जाणार आहे. तर १ लाखापेक्षा अधिक मुद्रांक शुल्क आणि दंड असल्यास मुद्रांक शुल्कात ४० टक्के आणि दंडात ७० टक्के सवलत दिली जाणार आहे.
याच टप्प्यात १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या दस्त नोंदणी प्रकरणात २५ कोटी रुपयांपर्यंतच्या मुद्रांक शुल्कात २० टक्के सवलत दिली जाणार आहे. दंडाची रक्कम ५० लाखापेक्षा कमी असल्यास ८० टक्के कपात दिली जाणार आहे. तर ५० लाखाहून अधिक दंड असल्यास त्यात ५० लाखाची दंड वसूली करत उर्वरित रक्कम माफ केली जाणार आहे. आणि २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक मुद्रांक शुल्क असल्यास मुद्रांक शुल्कात १० टक्के सवलत आणि दंडाच्या रकमेत २ कोटी पर्यंत शास्ती आकारत उर्वरित रक्कम माफ करण्यात येईल. यामुळे या टप्प्यात जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या दस्तातील अनियमितता दूर करावी असे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
अभय योजनेसाठी स्वतंत्र कक्ष
योजनेसाठी अर्जदारांना संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात समक्ष किंवा ऑनलाइन अर्ज करता येतील. अर्जाचा नमुना www.igrmaharashtra.gov.in यावर उपलब्ध आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व सहजिल्हा निबंधक तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. योजनेची माहिती विशेष कक्षात उपलब्ध होईल. योजनेबाबत तक्रार आल्यास संबंधित जिल्ह्याचे सहजिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाचे कॉल सेंटर ८८८ ८०० ७७७७ यावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.