नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज मुंबईत येथे पार पडला या पारितोषिक वितरण समारंभात नाशिक विभागात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या गटात दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा जऊळकेने प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा जऊळकेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांनी प्रथम पारितोषिक व पुरस्कार रक्कम २१ लक्ष रुपयांचा धनादेश स्विकारला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देवल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, विधान परिषद सदस्य कपिल पाटील, विक्रम काळे हे मान्यवर उपस्थित होते.
शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवण्यात आला राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे योजनेसाठी निश्चित करण्यात आली होती.
ही योजना शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह सर्व व्यवस्थापनांच्या शाळेत राबविण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी जऊळके शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जोपळे, शिक्षक किरण कापसे, कमल देवरे, कल्याणी वाशिकर, उत्तम भोये, हरिभाऊ बच्छाव, नरेंद्र सोनवणे, सुप्रिया धोंडगे, विद्यार्थी व पालक व ग्रामस्थ यांचे अभिनंदन केले.