नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजपर्यंत नाशिक फर्स्टने २,५०,००० लोकांना रस्ता सुरक्षेचे प्रशिक्षण देऊन एक जादूई आकडा पार केला आहे. यात केवळ २,५०,००० व्यक्ती नाही तर २,५०,००० सुजाण कुटूंब आज नाशिक फर्स्टशी जोडली गेली आहेत. आणि यासाठी नाशिक फर्स्टने आजपर्यंत ४,७५० ट्रेनींग सेशन्स पूर्ण केली आहेत आणि ते ही संपूर्णपणे विनामूल्य! परंतु नाशिक शहराची लोकसंख्या जवळपास २३ लाखांपर्यंत पोहोचली आहे. नाशिक फर्स्ट ने संपूर्ण नाशिककरांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. म्हणजेच नाशिक फर्स्ट ध्येयाच्या १० % च्या आसपास गेले आहे अजून ९०% लोकांपर्यंत पोहोचयाचे आहे. आणि त्यांचे हे प्रयत्न अविरतपणे सुरू आहेत.
या शहराने आपल्याला खूप काही दिलंय, तर त्याला परतभेट म्हणून आपणही काहीतरी दिलं पाहिजे याच उदात्त हेतूने नाशिक मधील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येवून १९ डिसेंबर २००९ रोजी नाशिक फर्स्ट या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. शहराच्या प्रगतीसाठी विविध मुद्द्यावर काम करतांना अभ्यास करून सुधारणा सुचविणे, सरकारी यंत्रणांबरोबर वारंवार संवाद साधणे, त्यांचा पाठपुरावा करणे आणि त्याचबरोबर या सुविधांसंदर्भात सर्व क्षेत्रातील संस्थांशी समन्वय साधणे अशा तीन स्तरांवर नाशिक फर्स्टने कामाला सुरूवात केली. काही कालावधीनंतर नाशिक शहराची इतर शहरांबरोबरची जोडणी आणि वाहतूक या दोन प्रमुख मुद्द्यांवर आधिक सखोलपणे काम करण्याचे ठरविले व ते आजपर्यंत अविरतपणे सुरु आहे. त्याचीच एक सर्वात मोठी उपलब्धी म्हणजेच नाशिक मुंबई महामार्गावरील भिवंडी बायपास केवळ नाशिक फर्स्ट च्या सतत पाठपुराव्यामुळे नागरिकांना खुला झाला. नाशिक फर्स्टने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील ठाणे भिवंडी बाय-पासच्या वाहतुकीची स्थिती रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग, भारत सरकार आणि संबंधिक इतर सर्व सरकारी विभाग यांचे अधिकारी व नाशिकचे लोकप्रतिनिधी यांच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिली होती. ठाणे-भिवंडी बायपास रस्त्याचे आठ पदरी करणे, कल्याण जंक्शन उड्डाणपूल आणि कळंबोली लिंक रोड उड्डाणपूल पूर्ण करणे हे प्रश्न नाशिक फर्स्टने सरकार दरबारी उपस्थित करून विविध शासकीय प्राधिकरणांशी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केल्यानंतर अखेरीस, MMRDA द्वारे या बायपास आणि उड्डाणपुलाच्या कामाची प्रगती जलद गतीने करण्यात नाशिक फर्स्टला यश आले.
नाशिक फर्स्टच्या कामाचा केंद्रबिंदू हा कायम नाशिककर हाच होता व नाशिककरांचे राहणीमानाचा दर्जा उंचावणे हा आहे. त्यामुळेच नाशिककरांना रोज भेडसावणार्या आणि भविष्यात कळीचा मुद्दा ठरणार्या शहरातील वाहतूक समस्येला केंद्रस्थानी ठेऊन नाशिक फर्स्ट ने आपल्या मुख्य वाटचालीला सुरूवात केली. वाहतूक समस्येमधला सर्वात चिंताजनक विषय आहे तो रस्ते अपघाताचा. अशा दु:खद घटनांमुळे अनेक कुटूंबे उद्ध्वस्त झाली आहेत आणि अजुनही होत आहेत आणि याला कारण केवळ थोडीशी घाई, निष्काळजीपणा, अज्ञान आणि अती साहस हेच आहे. जर वाहन चालवणारा नाशिककर योग्यरीत्या प्रशिक्षित असेल तर कुणावरच ही दूर्दैवी वेळ येणार नाही. यासाठी सुरुवातीला रस्त्यावर, सिग्नलवर उभे राहून गांधीगिरीने वाहतूक नियमांचे जनजागृती अभियान आणि शाळा कॉलेजेस, व अस्थापनांमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रशिक्षण याद्वारे ही मोहीम सुरू झाली. परंतु यावर थांबून चालणार नव्हते. सुजाण, जबाबदार नागरिक आणि सुरक्षीत वाहनचालक निर्माण करण्यासाठी काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहीजे याच उद्देशाने चाचपणी सुरू केली व त्यादृष्टीने विचारमंथन सुरू केले. अणेकवेळा विचारमंथन केल्यानंतर नाशिकमध्ये ट्रॅफिक एज्युकेशन पार्क स्थापण करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु सर्वात पहिली अडचण होती ती जागेची, ती अडचण नाशिक महानगरपालिकेने जागा नाममात्र भाडेतत्वावर देऊन दूर केली. त्यानंतर नाशिक महानगरपालिका, नाशिक आरटीओ आणि नाशिक शहर पोलीस याच्या सहाय्याने आराखडा तयार करण्यात आला व महिंद्र अॅण्ड महिंद्र, लॉर्ड(पार्कर) आणि एबीबी या आमच्या प्रमूख प्रायोजकांच्या मदतीने या संकल्पनेचे मूर्त स्वरूप म्हणजेच आजचे हे शहराच्या हृदयातील म्हणजेच मध्यवर्ती ठिकाणी असणारे तिडके कॉलनीतील आठवड्याचे सातही दिवस अविरतपणे सुरू असणारे ट्रॅफिक एज्युकेशन पार्क होय.
नाशिक फर्स्ट ने सुरक्षित नाशिकच्या उद्देशाने नाशिक महापालिकेच्या सहकार्याने व महिंद्र अँड महिंद्र लि. व लॉर्ड इंडिया प्रा. ली. यांच्या आर्थिक पाठबळामुळे “ट्रॅफिक एज्युकेशन पार्क” नावाचा देशातील एक उत्कृष्ट असा एकमेवाद्वितीय प्रकल्प उभारला आहे. उत्तर महाराष्ट्रातील हे पहिले “ट्रॅफिक एज्युकेशन पार्क” आहे. या ठिकाणी सुरक्षित वाहतुकीचे प्रशिक्षण दिले जाते.
ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये प्रशासकीय कार्यालय, ग्रंथालय आणि प्रशिक्षण सभागृह महिंद्रा अँड महिंद्रा च्या आर्थिक सहाय्याने व देखरेखीखाली शहरातील वास्तविक वर्दळीच्या रस्त्यांचे पूर्वावलोकन करण्यासाठी उद्यानात मॉक स्ट्रक्चर्स देखील बांधण्यात आले आहेत. उद्यान हा एक सुनियोजित आणि पद्धतशीरपणे बांधलेला परिसर आहे की ज्यामध्ये पादचारी सुरक्षा सूचना देखील चिन्हांकित केल्या आहेत. रस्ता सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर नागरिकांना शिकवण्यासाठी आधुनिक प्रशिक्षण सुविधांसह कार्यक्षमपणे सुसज्ज हॉल देखील बांधण्यात आला आहे. उद्यानात पेट्रोलपंप, पादचारी पूल, बस स्टॉप, शाळा, रुग्णालय, ॲम्फीथिएटर, सिग्नल, वाहतूक चिन्हे इ. च्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत.
ट्रॅफिक एज्युकेशन पार्क सुरू झाल्यानंतरही कधी रस्त्यावर उतरून, कधी रेडीओवरून, कधी समाज माध्यमांवरून तर वेळप्रसंगी मल्टीपेक्समधून नाशिककरांना सुरक्षित वाहतूक संस्कृती निर्माण करण्यासाठी नाशिक फर्स्ट सतत साद घालत आहे. तरूणाईशी त्यांच्या भाषेत, मुलांना मुलांच्या भाषेत कल्पक पध्दतीने संदेश देण्यात येतात. सर्वात प्रमुख भर देण्यात येतो तो प्रशिक्षणावर ! भविष्यातील वाहनचालक म्हणजेच शाळेतल्या मुलांपासून याची सुरूवात करण्यात आली. आणि पुढे याची व्याप्ती वाढत जाऊन तरूण, प्रौढ, वरिष्ठ नागरिक असे सर्वच यात सामील होत गेले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रशिक्षण सर्वांसाठी म्हणजेच शाळा, कॉलेजेस, इंडस्ट्रीज, सरकारी कार्यालये अशा सगळ्या क्षेत्रातील नागरिकांना मोफत म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या शुल्काविना दिले जाते.
नाशिक फर्स्ट ने रस्ते सुरक्षेसाठी शहरातील वाहतूक सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी दुचाकी, चारचाकी आणि/किंवा इतर वाहने चालवणाऱ्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावे या दृष्टिकोनातून, शाळा आणि महाविद्यालयांच्या स्कूल बस चालकांसाठी विशेष अभ्यासक्रम तयार करून शाळा आणि महाविद्यालयांच्या स्कूल बस चालकांसाठी विशेष प्रशिक्षण सुरू केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि मोटार वाहन अधिनियमानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू केले.
आज ग्राहक संरक्षण चळवळ ही जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठी चळवळ आहे आणि तिचे महत्त्व जगभरात वेगाने पसरत आहे. आपण २४ डिसेंबर आणि १५ मार्च या दिवशी अनुक्रमे राष्ट्रीय आणि जागतिक ग्राहक दिवस साजरे करतो परंतु या दिवसांच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेले शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या तात्पुरत्या स्वरूपामुळे ते ग्राहक हक्कांचे उल्लंघन कमी करण्यासाठी पुरेसे नाहीत. म्हणून नाशिक महानगरपालिका व नाशिक येथील नामवंत स्वयंसेवी संस्था (नाशिक फर्स्ट) अॅडव्हांटेज नाशिक फाऊंडेशन च्या ट्रॅफिक एज्युकेशन पार्क येथे लीगल मेट्रोलॉजी विभागाने ३० मे २०२२ मध्ये कायमस्वरूपी ग्राहक जागृती केंद्र स्थापन केले आहे. येथे ग्राहकाला त्यांच्या हक्क आणि कर्तव्यांबद्दल जागरूक केले जाते. नाशिक फर्स्ट तर्फे दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा समारोप व बक्षीस समारंभ नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (निपम) चे अध्यक्ष व एमएसएल ड्राइव्हलाईन सिस्टिम चे जनरल मॅनेजर-एचआर श्री. हेमंत राख व वैध मापन शास्त्र नाशिक विभागाचे सहाय्यक नियंत्रक श्री. जयंत राजदेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राहक प्रबोधन केंद्र नाशिक फर्स्ट येथे संपन्न झाला.
हा प्रवास फक्तं नाशिक फर्स्टचा नाही, तर सगळ्या नाशिककरांचा आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत या माध्यमातून जोडले गेलेले लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि आपल्या प्रयोजकांचाही आहे. कारण त्यांच्या मदतीशिवाय हे शिवधनुष्य पेलणे शक्य नव्हते. ज्या ज्या वेळी नाशिक फर्स्ट ने काही नवीन ध्येय ठरविले त्या प्रत्येक वेळी ते त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे होते. कुठलेही ध्येय पूर्ण करतांना हाताला हात देणार्याचीही गरज असतेच आणि तो पाठिंबा नाशिक फर्स्ट ला भरभरून मिळाला. आपलं शहर आधुनिक असण्याबरोबरच सुरक्षीतही असावं हा विचार घेऊन नाशिक फर्स्ट पुढे निघाले आहेत.
आज नाशिक फर्स्टने २,५०,००० चा जादूई आकडा पार केला आहे. म्हणजेच केवळ २,५०,००० व्यक्ती नाही तर २,५०,००० सुजाण कुटूंब आज नाशिक फर्स्टशी जोडली गेली आहेत. आणि यासाठी नाशिक फर्स्टने आजपर्यंत ४,७५० ट्रेनींग सेशन्स पूर्ण केली आहेत आणि ते ही संपूर्णपणे विनामूल्य!
आज सुरक्षित चालकांचा अडीच लाखाचा टप्पा नाशिक फर्स्ट ने पार केलाय. पुढल्या काळात तो ५ लाख, ६ लाख ही क्रॉस करेल. पण नाशिक फर्स्ट या नंबर्सच्या पलीकडे जाऊन विचार करतेय. एक दिवस असा असेल की नाशिकमध्ये ड्रायव्हींग करतांना मोबाईल न वापरणे ही स्वयंशिस्त असेल, सिग्नल पाळणे ही संस्कृती असेल, झेब्रा क्रॉसिंगवरून वडीलधार्यांना बिनधास्त जाऊ देणे हा त्यांच्याविषयीचा आदर असेल आणि असे सर्व नाशिककर एकमेकांची एकत्र कुटूंबासारखी काळजी घेतील. आणि एकही नाशिककर वाहतुकीचे नियम मोडणार नाही व नाशिक अपघातशून्य होईल.