नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –जिल्हा प्रमाणपत्र जात पडताळणी समिती नाशिक येथे जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे त्रुटी पूर्तते अभावी अर्जदार स्तरावर प्रलंबित आहेत. त्याअनुषंगाने जात पडताळणीच्या त्रुटीयुक्त अर्जाचा निपटारा करण्यासाठी आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियान अंतर्गत १२ वी विज्ञान शाखेतील सीईटी दिलेल्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी ११ मार्च पर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त तथा सदस्य यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियान अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत व महासंचालक, बार्टी यांच्या निर्देनुसार राज्यतील 2024 या वर्षी इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील सीईटी दिलेल्या सर्व मागावर्गीय विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे त्रुटी पूर्ततेअभावी अर्जदार स्तरावर प्रलंबित आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. याअनुषंगाने अर्जदारांनी नोंदणी केलेल्या ई मेलवर CCVIS-II प्रणालीद्वारे संबंधित अर्जदारांना त्रुटी कळविण्यात आल्या आहेत. त्यांची पूर्तता अद्यापपर्यंत ज्या अर्जदारांनी केलेली नाही त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा अर्जदारांनी त्रुटीसह व मूळ कागदपत्रांसह 11 मार्च 2024 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.00 ते सायंकाळी 4.00 या वेळेत उपस्थित रहावे.
अर्जदारांकडून वरील कालावधीत त्रुटी पुर्तता न केल्यास त्यांच्या प्रकरणांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. तसेच कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्तिकडे संपर्क करू नये व त्रयस्थ व्यक्तिच्या अमिशास बळी पडू नये, असे आवाहनही उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.