नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदावरी खोऱ्यातील तसेच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात पर्जन्यमान कमी प्रमाणात आहे. जायकवाडी जलाशयासाठी समन्यायी कायद्यानुसार दारणा प्रकल्प समुहातून 2310 द.ल.घ.फू इतके पाणी 24 ते 29 नोव्हेंबर 2023 या कालावधीत सोडण्यात आले असल्याने पर्यायाने या जलाशयातील पाणीसाठे कमी झाले आहेत जलसंपदा विभागाकडून दारणा समुह ( दारणा, मुकणे, वालदेवी, वाकी, भाम व भावली) प्रकल्पांसाठी उन्हाळ हंगाम 2023-24 साठी सिंचनाचे जाहिर प्रगटन/ निवदेन काढण्यात आलेले नाही. त्यामुळे दारणा समूहातील दारणा, गोदावरी व वालदेवी नदीवरील उपसा लाभधारकांनी आणि शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगाम 2024 मध्ये कोणतीही पिके जलाशयाच्या पाण्यावर विसंबून घेऊ नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
दारणा समुहातून जायकवाडीस सोडलेल्या पाण्यामुळे उपलब्ध पाण्यातून पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वजा जाता रब्बी हंगातील पिकांसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 1 मार्च 2024 पासून उन्हाळ हंगाम सुरू झाला असून जलाशयातील शिल्लक पाणीसाठा 31 जुलै 2024 पर्यंत पिण्यासाठी राखीव आहे. त्यामुळे लाभधारकांना पिकासाठी पाणी उपलब्ध न झाल्यास त्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही, असेही कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.