मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परिचारिका संवर्गातील सर्व स्तरावरील शुश्रूषा, शैक्षणिक व प्रशासकीय विभागातील तसेच प्राचार्यांची पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. परिचारीका संघटनांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी परिचारिकांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, उपसचिव वैशाली सुळे तसेच परिचारिका संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, मेट्रन तसेच परिचारिकांच्या रिक्त पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासाठी रिक्त पदांचा आढावा घेऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी. परिचारिकांना शुश्रूषा अधिकारी पदनाम देण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक संवर्गातील काम देऊ नये तसेच, रिक्त लिपिक पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी. वैद्यकीय महाविद्यालयात पाळणाघर असणे अत्यावश्यक आहे. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाबाबत कार्यवाही सुरू असून, नव्याने बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानात या कर्मचाऱ्यांना सोयी देण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
सहसंचालक पद निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावा, केंद्राप्रमाणे नर्सिंग भत्ते, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत देय असलेला भत्ता, गणवेश भत्ता मिळण्यासंदर्भात वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिले.