नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा परिषदेच्या वतीने “थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ” यांच्या जयंती निमित्त दरवर्षी जिल्हा परिषदेच्या १५ प्राथमिक शिक्षिकांना “थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार ” दिला जातो. सन २०२२-२३ व सन २०२३-२४ या वर्षातील पुरस्कारांची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम आज ४ मार्च २०२४ रोजी जी-ई सोसायटीच्या विद्यानगर, नाशिक येथिल गुरुदक्षिणा सभागृह येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नाशिक श्रीमती आशिमा मित्तल यांच्या हस्ते संपन्न झाला.
सन २०२२-२३ या वर्षातील १५ प्राथमिक शिक्षिका व सन २०२३-२४ या वर्षातील १५ प्राथमिक शिक्षिका अशा एकूण ३० प्राथमिक शिक्षिका यांना थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मा. प्रतिभा संगमनेरे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, प्रताप पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, (महिला व बालविकास), मा. शिक्षणाधिकारी (प्राथ) डॉ. नितीन बच्छाव हे उपस्थित होते.