पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकाच गाडीने प्रवास केल्यामुळे राजकीय वर्तूळात चर्चा सुरु झाली आहे. या दोन्ही नेत्यांबरोबर आज मंत्री दिलीप वळसे पाटील होते. हे तीन नेते विविध विकासकामांची उद्घाटने आणि शेतकरी मेळाव्याला उपस्थित होते.
शिरुर लोकसभा मतदारसंघ सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाविकास आघाडीकडून या मदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांचे लोकसभेचे तिकीट निश्चित आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून या मतदारसंघात अनेक जण इच्छुक आहेत. या मतदारसंघात शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांची चांगली ताकद आहे. पण, शिरुरमध्ये राष्ट्रवादीचा विद्यमान खासदार असल्यामुळे महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी सुटण्याची शक्यता आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघ हा जागावाटपात अजित पवार गटाला मिळाला तर आढळराव राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तिघांचा प्रवास आज चर्चेचा ठरला…
आंबेगाव तालुक्यात मंचर येथील पोलीस ठाणे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे निवासस्थान, घोडेगाव येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे निवासस्थान, जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण पंकज देशमुख, माजी आमदार पोपटराव गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, कार्यकारी अभियंता रावबहादूर पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यमपल्ले, तहसीलदार संजय नागटिळक, गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक कैलास पाटील, तंत्र शिक्षण विभागाचे सह संचालक दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्याची कायदा व सुव्यवस्था राखत असतांना पोलीस दल विविध सण, उत्सव आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्यावेळी ऊन, थंडी, पाऊस, सुट्टीची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या सोबत त्यांचा परिवारांदेखील विविध अडीअडचणीना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा देणे गरजेचे असून त्याादृष्टीने शासन प्रयत्नशील आहे.
पोलीस दलासाठी अत्याधुनिक पोलीस ठाणे, सुसज्ज निवासी वसाहती उभे करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच जिल्हा ग्रामीण पोलीस दलाला वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. पर्यावरणाचा समतोल साधतांना शासकीय इमारती आणि वसाहतीच्या ठिकाणी चांगल्याप्रकारे जागेचे सपाटीकरण करुन अधिकाधिक वृक्षारोपण करावे, परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन पवार यांनी केले.