इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारींची यादी जाहीर केल्यानंतर दोन उमेदवारांनी निवडणूक लढवण्यास विरोध केला. तर काहींना तिकीट न मिळाल्यामुळे राजकीय सन्यासाची घोषणा केली. त्यामुळे समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपवर बोचरी टीका केली. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले आहे की, आता जनतेशिवाय खुद्द भाजपवालेही म्हणू लागले आहेत: ‘भाजप नको’….
उत्तर प्रदेशमध्ये बाराबंकीचे खासदार उपेंद्र सिंह यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला. एका कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आपली दावेदारी मागे घेतली. याअगोदर भोजपुरी स्टार पवनसिंह यांनी पश्चिम बंगाल येथील आसनसोल येथून निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले असून त्यांनी आता भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
यादव यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, भाजपला असे दिवस येतील असे कोणाला वाटले असेल. तिकीट मिळण्यापूर्वी आणखी काही काम जास्त महत्त्वाचे आहे, असे सांगून काही उमेदवार उमेदवारी सोडून देतील. काहीजण राजकारणापेक्षा खेळाला अधिक गंभीर मानतील आणि बाहेर जाण्याची चर्चा करतील. पर्यावरणाच्या बहाण्याने अध:पतन झालेल्या भाजपमधून बाहेर पडण्यासाठी कोणी अर्ज लिहील. तिकीट कापले तर कोणी निवृत्ती जाहीर करेल. तिकीट मिळाल्यानंतरही वैयक्तिक कारणांमुळे सोशल मीडियावर दुरूनच कोणीतरी तिकीट नाकारेल. पक्ष म्हणून भाजप कधीच कमकुवत नव्हता. आता जनतेशिवाय खुद्द भाजपवालेही म्हणू लागले आहेत: ‘भाजप नको’