नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वृंदावननगर भागात रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळय़ातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्चना सुभाष डोंगरे (३५ रा.ब्रम्हकमळ सोसा.जवळ,शिवाजीनगर दिंडोरीरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. डोंगरे रविवारी (दि.३) वृंदावननगर भागात गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्या कॉलनीरोडने आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. शांतीदूत बंगल्यासमोरून त्या पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सोन्याची पोत ओरबाडून नेली. अधिक तपास जमादार भोज करीत आहेत.
दोन गावगुंडाना पोलीसांनी पुन्हा ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावर ठेवणा-या दोन गावगुंडाना पोलीसांनी पुन्हा बेड्या ठोकल्या. वेगवेगळय़ा भागात ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी मुंबईनाका व म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चेतन गोपाळ जाधव (२५ रा.महादेव मंदिराजवळ,बजरंगवाडी) व हर्षल सुनिल वनवे (रा.तारांगण सोसा.राहू हॉटेल जवळ,म्हसरूळ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित गावगुंडाची नावे आहेत. दोघांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमिवर शहर पोलीसांनी त्यांच्याविरोधात हद्दपारीची कारवाई केली आहे. मात्र त्यांचा वावर शहरातच होता. पोलीस त्यांच्या मागावर असतांना रविवारी (दि.३) जाधव आपल्या राहत्या घरात तर वनवे म्हसरूळ ते म्हसोबावाडी दरम्यानच्या बोरगड येथील कॅनलच्या पुलावर मिळून आला. याबाबत अंमलदार सागर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबईनाका तर अंमलदार गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास अनुक्रमे हवालदार टेमगर व चव्हाण करीत आहेत.
कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजविणा-या तरूणावर पोलीसांची कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धारदार कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजविणा-या तरूणावर पोलीसांनी कारवाई केली. संशयिताच्या ताब्यातून लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य बबन त्रिभुवन (१९ रा.हांडोरे मळा,वडनेर दुमाला विहीतगावरोड) असे संशयिताचे नाव आहे. वडनेर दुमाला येथील वारकरी चौकात एक तरूण कोयत्याचा धाक दाखवित दहशत माजवित असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.३) शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने ही कारवाई केली. पथकाने धाव घेत संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे धारदार लोखंडी कोयता मिळून आला. याबाबत युनिटचे कर्मचारी सुनिल आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार सातभाई करीत आहेत.