नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवरील लेनन हॉटेल भागात भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मजूर ठार झाल्याची घटना घडली. रमेश रामभाऊ इंगळे (रा.कामगारनगर) असे मृत मजूराचे नाव आहे. वाहनाने दिलेल्या धडकेत इंगळे दुभाजकावर फेकले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
इंगळे शनिवारी (दि.२) सकाळच्या सुमारास कामाच्या शोधार्थ त्र्यंबकरोडवर आले होते. संतोषी माता मंदिर भागात भरणा-या मजूरांच्या थांब्यावर बराच वेळ थांबूनही काम न लागल्याने ते घरी परतण्यासाठी रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. रस्त्याने पायी जात असतांना नाशिकच्या दिशेने भरधाव जाणा-या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.
हा अपघात इतका भयंकर होता की, इंगळे दुभाजकावर फेकले गेले. त्यात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने अन्य सहका-यांनी तातडीने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक धनराज गावीत करीत आहेत.